Home Cities जामनेर पत्रकार ईश्वर हिवाळे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

पत्रकार ईश्वर हिवाळे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान


पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील निर्भीड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे पहूर येथील पत्रकार तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जामनेर तालुका उपाध्यक्ष ईश्वर भगवान हिवाळे यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिर्डी येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन आणि लघुउद्योग विकास संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते ईश्वर हिवाळे यांना स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष पंडितराव तिडके, मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळ सिंग राजपूत, ॲड. राणीताई स्वामी, जळगाव जिल्हाध्यक्ष महेश पाटील, महिला आघाडी अध्यक्ष सोनल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ईश्वर हिवाळे हे जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत असून, त्यांच्या निस्वार्थी आणि निर्भीड पत्रकारितेमुळे ते जनसामान्यांमध्ये परिचित आहेत. ग्रामीण भागातील अन्याय, भ्रष्टाचार आणि अपप्रवृत्तींना वाचा फोडण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी पत्रकारितेत सामाजिक भान जपले असून, आपली एक स्वतंत्र छाप निर्माण केली आहे.

त्यांच्या या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. हा सन्मान त्यांच्या पत्रकारितेतील कष्ट, सचोटी आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठेची पावती असून, यामुळे इतर पत्रकारांनाही आपले कार्य अधिक निष्ठेने करण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound