जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्रकारितेत समाजाचे प्रतिबिंब उमटत असल्यामुळे पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे. त्यामुळे या तिस-या डोळ्याचा वापर पत्रकारांनी समाजाच्या विकासासाठी सकारात्मक आणि सजगपणे करावा. असे प्रतिपादन जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ.विद्या गायकवाड यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत आयोजित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलसचिव डॉ.विनोद पाटील, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सुधीर भटकर, डॉ.गोपी सोरडे उपस्थित होते. पुढे बोलतांना आयुक्त डॉ.विद्या गायकवाड म्हणाल्या की, सोशल मीडिया हे सर्व आभासी विश्व आहे. या आभासी विश्वातून बाहेर पडून ज्ञान ग्रहण करणे जास्त महत्वाचे आहे. पत्रकारितेचा अभ्यासक्रम हा समाजाशी निगडित असतो, त्यादृष्टीने पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात पत्रकारितेचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. आयुक्त डॉ.गायकवाड यांनी याप्रसंगी भविष्यातील पत्रकारितेसाठी विद्याथ्र्यांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपात कुलसचिव डॉ.विनोद पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी करिअर करतांना उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मार्ग निवडला पाहिजे. तसेच पत्रकारितेचे नवनवीन प्रवाह, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला पाहिजे असेही डॉ.पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ सोहळ्यात विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शेलापागोटे (फिशपाँड), गीतगायनासह नृत्याविष्कार करत जल्लोष केला. यावेळी एम.ए.एमसीजे प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आणि पत्रकारिता पदविकेचे विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी देखील उपस्थित होते.
माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक, प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठासह प्रशाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच पंधरा वर्षात विभागातील विद्यार्थी विविध नामांकित माध्यम क्षेत्रांसह शासकीय क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन विद्यार्थिनी निकीता भोई, कोमल पाटील यांनी तर डॉ.गोपी सोरडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ.सोमनाथ वडनेरे, अॅड.सूर्यकांत देशमुख, रोहित देशमुख, राजेश प्रजापती, रंजना चौधरी, प्रकाश सपकाळे, प्रल्हाद लोहार उपस्थित होते.