पारोळा प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांना तालुक्यातील छत्रपती प्रतिष्ठानतर्फे पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
तालुक्यातील टोळी येथील श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या द्वितीय वर्धापन दिनी दि. २९ ऑक्टोबर रोजी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब हिलाल पाटील यांनी गुणग्राहक पत्रकारिता व संघर्षमय पण यशस्वी वाटचाल करुन केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळी कडून छत्रपती आदर्श पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे. पत्रकारिता ज्यांचा श्वास आहे व सामाजिक कार्य जीवनाचा ध्यास आहे असे व्यक्तीमहत्त्व म्हणून बाळासाहेब पाटील यांची ३० वर्षांपासून तालुक्यातील ओळख आहे.परंतु हा लौकिक त्यांना सहजासहजी मिळालेला नाही. यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन शिक्षण अर्धवट सोडून मिळेल ते काम केले. पत्रकारितेसह विरंगुळा म्हणून त्यांनी शेती व्यवसायात सुद्धा नेत्रदीपक कामगिरी केली आहे.पाच एकर शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीने शेती करत लिंबू, डाळींब, सिताफळ,बांबू,पेरु,रामफळ,नारळ यांची लागवड केली असून प्रगतीशील शेतकरी म्हणून लौकीक प्राप्त केलाआहे.
बाळासाहेब पाटील यांनी महाराणा प्रताप बहुउद्देशिय संस्था स्थापन करुन समाज संघटन, एकात्मता व प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. राजपूत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हे मानाचे पददेखील त्यांनी भूषविले आहे. आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाचीही त्यांना आवड आहे.तालुक्यात समाजप्रबोधन, जनजागृती, व्यसनमुक्ती,दारुबंदी,स्वच्छता अभियान,शांतता समितीच्या कामात त्यांचा पुढाकार असतो.
अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाला श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळी कडून छत्रपती आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती टोळी येथील छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.पृथ्वीराज श्रीराम पाटील यांनी दिली आहे.