नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या दिवशी जेएनयूच्या विद्यार्थ्यांना धमकावताच्या व्हायरल व्हिडिओतील नकाबधारी तरुणी भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ता कोमल शर्मा तर दुसरे नकाबधारी विद्यार्थी अक्षत अवस्थी, रोहित शहा असल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या तिघांना भारतीय दंड विधानाच्या कलम 160 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
या संदर्भात अधिक असे की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या टीमने एका नकाबधारी तरुणी आणि दोन तरुणांचा पर्दाफाश केला आहे. त्यानुसार जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या दिवशी चेहरा झाकलेले तरुणी आणि दोन तरुण जेएनयूच्या विद्यार्थ्यांना धमकावताना दिसून येत होते. आता या नकाबामागील चेहरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ता कोमल शर्माचा असल्याचे समोर आले आहे. कोमल दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या दौलतराम कॉलेजची विद्यार्थिनी आहे. एबीव्हीपीने सुद्धा ती आपल्याच संघटनेची सदस्य असल्याची कबुली दिली.
दिल्ली पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, जेएनयू हिंसाचार प्रकरणात चौकशीसाठी चुनचुन कुमार आणि दोलन सामंता यांना बोलावण्यात आले. दोघांना दिल्ली पोलिसांनी संशयित आरोपी म्हटले आहे. पोलिसांची एक विशेष टीम आता जेएनयूमध्ये जाऊन उलट तपास करत आहे. सोबतच, नकाबधारी विद्यार्थी अक्षत अवस्थी, रोहित शहा आणि कोमल शर्मा यांचा सध्या कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दावा केला, की त्यांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 160 अंतर्गत कोमल आणि इतर दोन युवक अक्षत तसेच रोहित यांना नोटीस बजावली आहे. एबीव्हीपी दिल्लीचे राज्य सचिव सिद्धार्थ यादव यांनी कोमल आपल्याच संघटनेची सदस्य असल्याचे मान्य केले.