अहमदाबाद (वृत्तसंस्था) येथील एच. के. आर्ट्स कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आमदार जिग्नेश मेवानी यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाठवलेले निमंत्रण कॉलेजच्या विश्वस्तांकडून अचानक रद्द करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विश्वस्तांच्या निर्णयाचा निषेध म्हणून कॉलेजचे प्राचार्य हेमंतकुमार शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कॉलेजचा हा कार्यक्रम रद्द झाल्याने आ.मेवानींनी भाजपावर निशाणा साधला आहे. आपण याच कॉलेजचे विद्यार्थी आहोत, इथे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि त्यांचे मिशन यावर बोलणार होतो. मात्र, मी प्राचार्य हेमंत शाह यांना सॅल्युट करतो ज्यांनी नैतिक कारणाने आपल्या पदाचा राजीनामा दिला, असे मेवानी म्हणाले. महाराष्ट्रात देखील ज्येष्ठ लेखिका नयनतारा सेहगल आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले होते. वडगावचे आमदार असलेले जिग्नेश मेवानी हे या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.मेवानी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सोमवारी (दि.११) वार्षिक स्नेहसंमेलनात पुरस्कारांचे वाटप होणार होते. मात्र, कॉलेजच्या विश्वस्तांनी अचानक हा कार्यक्रमच रद्द केला. आमचा मेवानींना विरोध नाही मात्र, जर ते या कार्यक्रमाला आले असते तर कॉलेजचे वातावरण बिघडले असते, त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कॉलेजचे विश्वस्त अमरिश शाह यांनी सांगितले.
दरम्यान, मेवानींना कॉलेजमध्ये येण्यापासून रोखल्याने राजीनामा दिलेले प्राचार्य हेमंतकुमार शाह यांनी कॉलेजचे विस्वस्त मंडळी लोकशाहीविरोधी वागत असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. तसेच वातावरण बिघडेल म्हणजे नक्की काय होईल याचे स्पष्टीकरण विश्वस्तांनी द्यावे अशी विचारणाही त्यांनी केली आहे. कॉलेजच्या काही लोकांनी सांगितले की, मेवानींनी जर या कार्यक्रमाला हजेरी लावली तर कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी काही विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यामुळे प्राचार्य वगळता सर्व विश्वस्त आणि उपप्राचार्य मोहन परमार यांनी हा कार्यक्रमच रद्द करण्यावर शिक्कामोर्तब केले. परमार यांनीही आपल्या उपप्राचार्य पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.