अमळनेर येथे पाडळसरे धरण आंदोलन समितीचे जेलभरो आंदोलन (व्हीडीओ)

अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे धरणासाठी निधी मिळावा या मागणीसाठी गेल्या १० ते ११ दिवसांपासून जनआंदोलन समितीतर्फे साखळी उपोषण सुरु आहे. त्याअंतर्गत आज दुपारी १२.३० वाजता जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये पारोळ्याचे आमदार सतीश पाटील यांनी शासनाच्या ध्येय धोरणावर टीका करून शासनाला रस्त्यावर आणा अशी घोषणा केली.

आतापर्यंत या साखळी उपोषणास भेट देण्यासाठी आ.स्मिता वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी. पाटील आलेले नाहीत. एकीकडे म्हणायचे की, धरणासाठी निधी आणू आणि इकडे धरण आंदोलन समितीचे कार्यकर्ते उपोषणाला बसले असताना त्यांची साधी विचारपूस करायची नाही, अशा शासनाचा मी निषेध करतो. या आंदोलनाला माझा नेहमी पाठिंबा राहील. असे त्यांनी यावेळी जाहीर केले. तहसिलदार ज्योती देवरे यांनी यावेळी म्हटले की, आंदोलक शांततेच्या मार्गाने साखळी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या भावना लागलीच मी जिल्हाधिकारी यांना कळवल्या आहेत. विचारविनिमय करून हे उपोषण थांबवावे, असे आवाहनही त्यांनी शासनाच्या वतीने केले.

 

या जेलभरो आंदोलनामध्ये आ. सतीश पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, प्राध्यापक शिवाजीराव पाटील, देवीदास पाटील, रणजित शिंदे, वसुंधरा लांडगे, माधुरी पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, सबगव्हाणणचे सरपंच नरेंद्र पाटील, प्रा.अशोक पवार, भागवत पाटील, काँग्रेसचे पराग पाटील, गोकुळ पाटील, मनोज पाटील आणि विविध संघटनेचे युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमळनेरचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व त्यांचे सर्व सहकारी यांनी धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकले व लागलीच त्यांची मुक्तताही केली.
पाडळसरे धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवण्याच निर्धार जनआंदोलन समितीने व्यक्त केला आहे. त्यासाठी आता ७ मार्च रोजी धरण स्तलावर सकाळी ११.०० वाजता जल सत्याग्रह केला जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त संख्येने तालुक्यातील शेतकरी विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content