अमळनेर प्रतिनिधी | प्रामाणिकपणा आणि सतर्कतेने आपली जबाबदारी पार पाडत ‘महत्वाचे कागदपत्र, चेक, दागिने, रोकड आणि शस्त्र असलेली बॅग परत केल्यामुळे दुकान मालकाने अमळनेर पोलीसांचा सत्कार केला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, ‘रात्रीची गस्त सक्तीने होण्यासाठी दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी जळगावचे पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे जळगाव यांच्या हस्ते उद्घाटन करुन अमळनेर पोलीस स्टेशनला ‘RFID गार्ड मॉनिटरिंग सिस्टिम प्रणाली’ चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक, अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आली.
या प्रणालीत अमळनेर शहर, तसेच कॉलनी परिसरात तीन सेक्टर रात्रीच्या वेळेत तसेच दिवसाचे वेळी शाळा, कॉलेज परिसरात असे ५० ‘RFID टॅग लावून चार ‘RFID मॉनिटरिंग मशीनद्वारे नियंत्रित करण्यात येतात.
आज सोमवार दि. २४ जानेवारी रोजी अमळनेर शहरातील सेक्टर क्रमांक ३ मध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे आणि पोलीस नाईक विनोद धनगर यांची रात्र गस्तकरता ड्युटी लावण्यात आली होती. ते ‘सेक्टर क्रमांक तीन’ मधील ‘RFID टॅग मशीनद्वारे स्कॅन करत सतर्कतेने गस्त घालत असताना ‘सराफ बाजार’मधील ‘अचिंबा ज्वेलर्स’ दुकानासमोर त्यांना रात्री ३.४५ वाजता दुकानाच्या बाहेर एक बॅग दिसली. यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चेक, इतर कागदपत्रे तसेच लायसन्स असलेले पिस्टल होते.
अंमलदार यांनी दुकानाचे मालक विनोद वर्मा यांना दरवाजातून ठोकून बाहेर बोलावलं असता त्यांनी, “मी रात्री एक वाजता बाहेर गावाहून घरी आलो. गाडीतील इतर सामान उतरवून दुकानाचे शटर उघडून घरात निघून गेलो. त्यावेळी माझी बॅग बाहेरच विसरून गेलो” असे सांगितले.
दोन्ही आमदारांनी वर्मा यांना बॅगेतील दागिने आणि रोकडची खात्री करण्याकरता सांगितले. त्यानी रोख रक्कम आणि दागिने बरोबर असल्याची खात्री करून घेतली. ‘अचिंबा ज्वेलर्स’चे मालक विनोद वर्मा यांनी पोलीस स्टेशनला येऊन रात्री घडलेली घटना सांगत “या दोन्ही अमलदारांमुळे माझे महत्वाचे कागदपत्र, दागिने आणि रोकड तसेच शस्त्र असलेली बॅग मला परत मिळाली” असल्याचे सांगत त्यांचा सत्कार केला. “अमळनेर पोलीस स्टेशनच्या दोन्ही अमलदारांनी प्रामाणिकपणे कार्य केल्याने पोलीस दलाची जनमानसात प्रतिमा उजळण्यास मोलाची मदत झाल्या”चे अमळनेरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सांगितले.’