सासरच्या मंडळीकडून जावयाचा खून !; गुन्हा दाखल करण्याचे खंडपिठाचे आदेश

court

जळगाव प्रतिनिधी । औरंगाबाद येथील तरूणाचा अमळनेर मधील मुंदडा नगरातील तरूणीशी विवाह झाला होता. विवाहनंतर भांडण होण्यास सुरूवात झाल्यानंतर तरूणी माहेरी निघून गेली. काही दिवसानंतर पत्नीला समजविण्यासाठी सासरी आलेल्या पती युवकावर पत्नीच्या कुटूंबियांनी रिव्हॉल्वरने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर युवक गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर धुळे व त्यानंतर मुंबई येथे उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान युवतीच्या कुटुंबियांनी बॅटरीचा स्फोट झाल्याचा बनाव करून आमची मुलगीही जखमी झाल्याचे सांगितले होते. पोलीसांनी देखील याप्रकरणी आर्थिकहित जोपासून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. युवकाच्या कुटुंबियांनी खंडपीठात धाव घेतल्यानंतर सुनावणीअंती खंडपीठाने युवतीसह तिच्या कुटुंबियांविरुध्द अमळनेर पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतरही अमळनेर पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नसल्याने मयताच्या कुटूंबियांनी जळगावात पत्रकार परिषद घेवून संताप व्यक्त केला. पत्रकार परिषदेला मयत योगेशची आई मंगलाबाई कुमावत, मावशी भारती कुमावत, मावसे ज्ञानेश्वर कुमावत, समाजअध्यक्ष संजय बेलदार, महेंद्र बोरसे उपस्थित होते.

असा आहे घटनाक्रम
औरंगाबाद येथील योगेश सुरेश कुमावत याचा अमळनेर येथील मुंदडा नगरातील माधुरी उदेवाल हिच्याशी 23 ऑगस्ट 2018 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर युवतीचे दुसर्‍या युवकाशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाल्यानंतर माधुरी ही 65 हजार रुपये घेवून माहेरी निघून आली होती. त्यानंतर तिने दोन लाख रुपये देवून वाद मिटवून टाका असे सांगितले होते. त्यानुसार योगेश दि.26 सप्टेंबर रोजी दिड लाख रुपये घेवून त्यांची एमएच.07.आर.2234 क्रमांकाची मोटारसायकल घेवून अमळनेर येथे आला होता. त्यानंतर योगेश हा माधुरी हिच्या घरी पोहचला की नाही हे विचारण्यासाठी योगेशची आई मंगलाबाई यांनी माधुरी हिची आई अमृता उदेवाल यांचा फोनवर संपर्क केला असता, त्यांनी तुमचा मुलगा जीवंत येणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर रात्री 1 वाजता योगेशचा भाऊ महेश याच्या मोबाईलवर फोन करून योगेश याने माधुरी हिला दोन गोळया तर स्वताला एक गोळी मारली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर योगेशच्या कुटुंबिय व नातेवाईकांनी अमळनेर येथे धाव घेतल्यानंतर त्याला धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने तो बोलण्याचा मनस्थितीमध्ये नव्हता.

उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू
माधुरी हिचा कुटुंबियांनी पोलिसांनी ब्लॉस्टींगचा स्फोट झाला असल्याने योगेश व माधुरी हे दोघे जखमी झाले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी योगेश याच्याविरुध्द भादंवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. जखमी योगेश याच्यावर धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. जखमी योगेशच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याला दि.2 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी दि.7 रोजी उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. योगेश जखमी असतांना व मयत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी वारंवार अमळनेर पोलीसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतू पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.

सात जणांविरुध्द गुन्हा दाखल होणार
योगेशच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. त्यांनी अमळनेर पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले. तरी देखील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत अल्याने योगेशच्या कुटुंबियांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. सुनावणीअंती न्या.टी.व्ही नलावडे व न्या.मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने माधुरी योगेश कुमावत, अमृता उदेवाल, बळवंत उदेवाल, नंदीनी उदेवाल, गिरीष उदेवाल, महेश कुमावत, रेणुका कुमावत या सात जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

पोलिसांचे जुगार्‍यांशी आर्थिक लागेबांधे
योगेशचे सासरे बलवंत श्रीकिसन उदेवाल यांचे अमळनेरला सट्टा, पत्ता जुगारचे अड्डे आहेत. त्यांचे अमळनेरचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्यासोबत त्यांचे आर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळेच ते न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत गुन्हा दाखल करीत नसल्याचा आरोप योगेशच्या कुटूंबियांनी केला आहे.

Add Comment

Protected Content