
अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी 15 ऑक्टोबर रोजी भव्य ‘जनअक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून तहसील कार्यालयाकडे हे आंदोलन बुधवारी दुपारी 1 वाजता काढण्यात येणार असून, मोर्चाला हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती किसान काँग्रेस सेलचे प्रा. सुभाष (जीभाऊ) पाटील यांनी दिली.

सदर मोर्चामागे ओला दुष्काळ जाहीर करून प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व ७/१२ कोरे करावेत, खरीप हंगामातील पिकांना तत्काळ पीक विमा मंजूर करावा, 2021 मधील अतिवृष्टीच्या नुकसानाचे उर्वरित अनुदान तातडीने वितरित करावे, एमएसपी (किमान आधारभूत किंमत) प्रमाणे भरड धान्याची खरेदी सुरु करावी आणि कापूस खरेदी तत्काळ सुरु करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या आहेत.
तालुक्यातील शेतकरी सध्या संकटात असून शासनाकडून आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा पत्ता नाही. त्यातच विमा कंपन्यांनीही हात झटकल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व मागण्या एकत्रित करून शासन दरबारी दबाव निर्माण करण्यासाठी हा जनआंदोलनात्मक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
प्रा. सुभाष पाटील यांनी सर्व शेतकरी, त्यांचे नातेवाईक, मित्र, शेजारी, तरुण आणि महिला वर्ग यांना मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले आहे. “मोर्चात डोकी मोजली जातात, जितकी डोकी जास्त तितका परिणाम अधिक,” असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांनी कामाचे कारण न देता मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन केले. हा लढा फक्त सध्याच्या समस्यांसाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आहे, असेही ते म्हणाले.
तालुक्यात याआधी झालेल्या आंदोलनांमध्ये शेतकऱ्यांची एकजूट दिसून आली आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये देखील प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. शासनाच्या विरोधातील संताप व्यक्त करत, हजारो शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि तहसील कार्यालयावर धडक देणार आहेत.



