जामनेर (प्रतिनिधी) । तालुक्यासह शहरातून खरेदी विक्री, नजरगहान खत, स्टॅम्प ड्युटी, इतर सर्व तत्सम कामासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आँनलाईन दस्त नोंदणीसाठी सर्व महत्त्वाची कामे सोडून हजर रहावे लागते, मात्र येथे आल्यानंतर पाच ते सहा दिवसाची तारीख मिळते. सर्व महत्त्वाची कामे सोडून हेलपाटे खावे लागत असल्याने नागरिकांमध्ये या कार्यालया विषयी संताप व्यक्त केला जात आहे.
पुर्वी आँफलाईन कामे असतांना एका दिवसामध्ये चारशे ते पाचशे दस्त नोंदणी केली जात होती. आता आँनलाईन दस्त नोंदणी असतांना सहा ते सात दस्त नोंदणी केली जाते. हा सर्व प्रकार नेट, सर्वर प्राँबलेम मुळे होत असल्याचे या कार्यालया कडून सांगण्यात येते. नेट प्राँबलेम हा आता नेहमीचाच विषय बनला असून त्यात आतापर्यंत कुठल्याही प्रकारची सक्षम पर्यायी व्यवस्था शासकीय स्तरावरून केली जात नाही. त्यामुळे नागरिकांचे असेच हाल होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या सर्वच आँनलाईन सेवांचा बोजवारा उडाला आहे. यामुळे कुठलेही काम वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
स्टॅम्पसाठी नागरींकांची हाल
जामनेर येथील कोषागर कार्यालय बंद करण्यात आले असून त्याला जळगाव येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना कोर्ट फी स्टँप ,कोर्ट टिकीट, साठी वनवन फिरावे लागत आहे. तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास अजून बराच अवधी लागणार आहे. स्टँप वेळेवर मिळत नाही उशिरा मिळाल्यानंतर ही जादा पैसे मोजावे लागत असल्याचे नागरीकांकडून सांगितले जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.