जामनेर प्रतिनिधी । आ. गिरीश महाजन यांच्या कार्यालयात काम करणार्या तरूणाला तिघांनी मारहाण केल्यानंतर शहरातील बजरंगपुरा परिसरात दगडफेक करण्यात आल्याची घटना रात्री घडली. तर प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला पोलिसांनी लाठीमार करून पांगविले.
आमदार गिरीश महाजन यांचा कर्मचारी ज्ञानेश्वर शिंदे यास बजरंगपुर्यातील तिघांनी भुसावळ रोडवर मारहाण केली. ही माहिती मिळताच अख्ख्या ओझर गावातील त्याच्या परिचितांनी जामनेरला येऊन बजरंगपुर्यात दगडफेक केल्याची घटना रविवारी रात्री घडली.
या वेळी पोलिसांनी खाक्या दाखवताच नागरिक जामनेरात सैरावैरा पळत सुटले. तर मारहाण करणार्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी सर्व ग्रामस्थ, नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता.
याबाबत वृत्त असे की, ओझर येथील तरूण ज्ञानेश्वर काशीनाथ शिंदे हा आमदार गिरीश महाजन यांच्या कार्यालयात संगणक ऑपरेटर म्हणून काम करतो. रविवारी सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान काम आटोपून तो भुसावळ रोडवरील एका मटणाच्या दुकानावर गेला. त्यावेळी खादगाव रोडवरून आलेले बजरंगपुर्यातील तिघे दुचाकीस्वार भुसावळ रोडच्या कॉर्नरला घसरून पडले. याप्रसंगी ज्ञानेश्वर व संबंधीतांमध्ये बोलचाल झाली. यानंतर ज्ञानेश्वर हा मटण घेण्यासाठी दुकानात गेला. या वेळी दुचाकीस्वार तिघांनी पाठीमागून येऊन हल्ला केला, यात शिंदे हा जखमी झाला. शिंदे सोबत असलेल्या मित्राने गावात फोन करून ही माहिती दिली. यामुळे ज्ञानेश्वरच्या परिचितांनी थेट बजरंगपुरा गाठून संबंधितांच्या घरावर दगडफेक केली. या संदर्भात माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सहकार्यांसह बजरंग पुर्यात जाऊन जमावाला पांगवले.
या संदर्भात पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत ज्ञानेश्वर शिंदे याने अनिल जगताप, योगेश चव्हाण यांनी मला पाठीमागून येऊन पाठीवर व नंतर छातीवर मारहाण केली. त्याचबरोबर हातातील घड्याळ व गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तोडून घेतली, असे नमूद केले आहे. त्यावरून अनिल जगताप, योगेश चव्हाण यांच्याविरुद्ध दरोड्यासह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील करत आहेत.
दरम्यान, खादगाव कॉर्नरला ज्ञानेश्वर शिंदे याने अपशब्द वापरल्याची माहिती अनिल जगताप व योगेश चव्हाण यांनी पोलिसांना दिली आहे.