जामनेर प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला असतांना जामनेर तालुक्यात एकाच दिवसात तब्बल १३ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पाच खासगी रूग्णालयातील पेशंट तर उपजिल्हा रूग्णालयातील तिघा रूग्णांचा समावेश आहे.
जामनेर तालुक्यात चोवीस तासात १३ कोरोनाबाधीतांचा मृत्यु झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधीक पाच रूग्ण जी.एम.हॉस्पीटलमधील असून जामनेर उपजिल्हा रूग्णालयातील तीघांचा तर समावेश आहे. तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी याला दुजोरा दिला आहे. गेल्या चोवीस तासात ११ कोरोनाबाधीतांचा विवीध रूग्णालयांमध्ये उपचार घेत असतांना तर दोघांचा दाखल करण्यापुर्वीच मृत्यु झाला आहे. कोरोनाच्या सुरूवातीपासून आतापर्यंत मृत्युच्या प्रमाणात गेल्या २४ तासांमधील मृत्युचे प्रमाण हे तीन टक्यांपेक्षा अधिक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मध्यंतरी जामनेर तालुक्यातील संसर्ग कमी झाला होता. मात्र अलीकडे पुन्हा एकदा रूग्णसंख्या वाढीस लागली असून यात मृतांचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
जामनेर तालुक्यात भितीपोटी बहुतांशी रूग्ण कोरोना चाचणी न करता गावातील किंवा नेहमीच्या डॉक्टरांकडेच उपचार घेत आहेत. एका डॉक्टरांनी चाचणी करावयास सांगीतली की उपचारासाठी दुसर्या डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे.यामुळे रूग्णांची परिस्थीती घरीच गंभीर होत असून उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने रूग्ण दगावत असल्याचे प्रतिपादन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी केले आहे.
दरम्यान, कोविडच्या संसर्गामुळे मृत झालेल्यांच्या कुटूंबीयांचीही कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना चाचणी न करता अनेक रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे धोका वाढत असून नागरीकांनी न घाबरता चाचणी करून तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाल्यास जिवीत हानी टळू शकते असे मत देखील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.