जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर ते बोदवडच्या दरम्यान दोन दुचाकी आणि कारच्या झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जामनेर ते बोदवडच्या दरम्यान असलेल्या वाडीकिल्ला गावाजवळ काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास विचीत्र अपघात झाला. यात दोन दुचाकी एकमेकांना धडकल्यानंतर कारने या दोन्ही दुचाकींना उडविले. बोदवडहून जामनेरकडे जाणार्या दत्तू रामा माळी आणि सुनील भोईल यांच्या दुचाकीचा वाडीकिल्ला येथून मालदाभाडी येथे जाणारे ईश्वर त्र्यंबक पारधी यांच्या दुचाकीची टक्कर झाली. यामुळे दोन्ही वाहने रस्त्यावर पडले. यातच भरधाव वेगात असलेल्या मागून आलेल्या कारने या दोन्ही दुचाकींना धडक दिली.
या भीषण अपघातामध्ये दत्तू रामा माळी, सुनील भोई आणि ईश्वर त्र्यंकर पारधी यांचा मृत्यू झाला असून कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाला आहेत. या महिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळाली नाही. तथापि, दोन दुचाकी आणि कारला एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या आणि यावरच मागून आलेली कार आदळली. ही कार नंतर बाजूला जाऊन पडली. तर अजून एक पीकअप व्हॅन मागून येत होती. या वाहनाच्या चालकाने अपघात पाहिल्यानंतर अचानक ब्रेक दाबले. मात्र यामुळे ही व्हॅन देखील बाजूला जाऊन पडल्याने यातील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.