दोन्ही मित्रांनी केली ऐश : शाब्दीक वादातून घडला अनर्थ !

पहूर . ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिंगायत येथील तरूणाच्या मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या त्याच्याच मित्राने खुनाच्या दिवशी घडलेला घटनाक्रमक पोलिसांना सांगितला असून यातून त्या दिवसाची माहिती समोर आली आहे.

येथील जामनेर रस्त्यावर दि.२१ रोजी सायंकाळी ३ ते ४ वाजे दरम्यान सोनाळे शिव रस्त्यावर एका शेतात शिंगायत येथील मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या केली होती. या खूनाचा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, पहूर पोलिस स्टेशन व जामनेर पोलिस स्टेशन यांनी संयुक्त पणे तपास करत आरोपीस अवघ्या २४ तासाच्या आत जेरबंद केले होते.

ही भयंकर घटना किरकोळ शाब्दीक वादातून घडली होती. या संदर्भात पोलीस चौकशीत आरोपीने माहिती दिली आहे. यानुसार, मयत प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ (वय३७) व आरोपी रवींद्र उर्फ बाळू भगवान हडप(वय ४१) राहणार शिंगायत हे दोघे मित्र होते. दि.२१ रोजी सकाळ ११ ते ११.३०च्या सुमारास जामनेर येथे त्यांची भेट झाली. मयत प्रमोद उर्फ बाळू याच्या टीव्हीएस. मोटरसायकल क्रमांक एम.एच१९डी.झेड.९७३१ ने पहूर जाण्यासाठी निघाले होते. सोनाळे फाट्यावर असलेल्या स्टड गार्डन या बिअर बार वर त्यांनी दारु पिऊन पहूर कडे प्रयाण केले.

दरम्यान, आपण पत्ते खेळण्यासाठी जात असल्याची माहिती प्रमोद वाघ यांनी मोबाईल वरुन शालकास माहिती दिली होती. मात्र पहूर येथे जुगार अड्डड्यावर पत्ते खेळात पैसे हारले. नंतर तेथेच मोटरसायकल गहाण ठेवून पैसे घेऊन परत पत्यात पैसे जिंकून त्यांनी मोटारसायकल सोडवली. यानंतर या दोघांनी पहूर येथील देशी दारू च्या दुकानात दारू पिऊन दोन बाटल्या सोबत घेतल्या. पहूर बसस्थानक परिसरातील हाटेलात जाऊन वडापाव पार्सल घेतले. चहाच्या दुकानातून पाण्याची बाटली तसेच शेरी फाट्यावरील रसवंती वरुन ग्लास घेऊन जामनेर रस्त्यावर सोनाळे शिव रस्त्यावर असलेल्या शेतात दारू सोबत वडापाव वर ताव मारला.

यानंतर दारू जास्त झालेल्या मयत प्रमोद याने आरोपी याच्याशी वाद घालून शिविगाळ करत काठीने पाठीवर मारहाण केली. याचा आरोपी रवींद्र उर्फ बाळू यास राग आला. रागाच्या भरात शेतात पडलेला दगड मयताच्या डोक्यात टाकला. यात प्रमोद उर्फ बाळू मयत झाल्याची खात्री करून त्यास शेतात फरफटत नेत मयताची मोटरसायकल व मोबाईल घेऊन पोबारा केला. मोटरसायकल जामनेर येथील बीओटी कॉंम्प्लेक्स खाली लावून शिंगायत गाठले, असा घटनाक्रम आरोपी रवींद्र उर्फ बाळू भगवान हडप याने त्यास घटनेची माहिती देतांना सांगितला. पोलिसांनी त्याला या सर्व ठिकाणी फिरवून घटनाक्रम जाणून घेतला.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे,पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे, संजय बनसोड, पो.कॉं.विनय सानप, गोपाल गायकवाड,या घटनेचा तपास करीत आहे. मयताच्या रक्ताचे नमुने, रक्ताने माखलेला दगड, माती,कपडे, व्हिसेरा प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविला आहे.
मयत प्रमोद आणि मारेकरी रवींद्र दोघे एकमेकांचे मित्र होते परंतु दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या वाद निर्माण झाला आणि यातूनच मित्राकडूनच मित्राची हत्या झाली .

Protected Content