मुंबई (वृत्तसंस्था) एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर आज खा.असादुद्दीन ओवेसी यांनी शिक्कामोर्तब केले आहे. जलील यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या वैयक्तिक निर्णय नसून तो पक्षाचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज होऊन या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला.एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यावर आपण फक्त ओवेसी यांच्याशी बोलू असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. ‘आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही, तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैदराबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जोपर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची युती कायम आहे,’ असे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले होते. त्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी यांनीही जलील यांचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितलेय. त्यामुळे आता एमआयएम आणि वंचित बहुजन यांची आघाडी तुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे