जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या अतिशय उष्णतेचे वातावरण सुरू असतांना राज्यात नव्याने उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान खाते अर्थात आयएमडीने आगामी काही दिवसांसाठी अलर्ट जारी केलेला आहे. आयएमडीनं राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आजपासून १२ एप्रिल दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान सध्या विदर्भात तीव्र उष्णतेचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. वाशिम, वर्धा, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमान ४२ अंशाहून अधिक आहे. यातच दक्षिण विदर्भात आणखी ५ दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती राहू शकते असा अंदाज हवामान विभागानं दिला. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंश किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यात बहुतांश भागांमध्ये अघोषीत भारनियमन सुरू असल्याचा दुहेरी फटका नागरिकांना बसल्याचे दिसून येत आहे.