जळगाव प्रतिनिधी । शहरातील आशाबाबा नगरमधील बंद घर फोडत ५६ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. घर मालक कानुबाई उत्सवासाठी बाहेर गावी गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधली.
याबाबत माहिती अशी की, विनय वाणी हे आज सकाळी कानुबाईचा सण असल्यामुळे आपली पत्नी श्रद्धा, मुले हिमांशु व भुमिका यांच्यासह रविवारी सकाळी १० वाजता घर बंद करुन आसोदा येथील घरी गेले होते. यानंतर चोरट्यांनी रात्रीतून वाणी यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर मागच्या खोलीतील कपाट तोडून त्यातून २२ हजार रुपयांची रोकड, प्रत्येक 2 व 5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, दोन सोन्याचे पदक, चांदीचे चैन व अंगठी असा सुमारे ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केले आहे.
याचबरोबर वाणी यांच्या लहान मुलाची प्लास्टीकची पीगी बँक देखील चोरट्यांनी कापुन त्यामधील एक हजार रुपयांची चिल्लर लांबवली आहे. हा सर्व प्रकार आज सोमवार रोजी सकाळी 11 वाजता श्रध्दा वाणी ह्या आसोदा येथून घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले तर दरवाजाचे कुलूप नव्हते. श्रध्दा घरात गेल्यावर कळले की, घरात चोरी झाली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.