जळगाव प्रतिनिधी | कागदोपत्री वाळूचा व्यवसाय बंद असला तरी तरी गिरणा पात्रातून याचा अंधाधुंद उपसा सुरू असून वाळू तस्कर हे कुणालाच जुमानत नसल्याचे चित्र आहे. यातच आज शिव कॉलनी स्टॉपजवळ वाळू वाहतूक करणार्या भरधाव वेगाने धावत असणार्या ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, वाळूची वाहतूक करणार्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने आज एमएच १९ व्ही-३४४१ क्रमांकाच्या रिक्षेला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, ट्रॅक्टरच्या धुडाची पुढील दोन्ही चाके ही रिक्षात रूतून बसली. या रिक्षेचा चालक हा रिक्षातून उतरून समोर उभा असल्याने त्याला यात इजा झाली नाही. मात्र भर चौकात घडलेल्या या अपघाताने प्रचंड खळबळ उडाली. संंबंधीत ट्रॅक्टर चालकाने घटना स्थळावरून पलायन केले.
दरम्यान, वाळूचा उपसा कागदोपत्री बंद असला तरी अनेक डंपर्स आणि ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून याची अवैध वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत असून यातूनच हा अपघात घडल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.