फसवणूक व सावकारीमुळे आत्महत्या : अखेर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी | शेतजमीन खरेदीत फसवणूक करून अवैध सावकारीच्या जाचातून अवाजवी वसुली केल्यामुळे आत्महत्या केल्याच्या कारणावरून दोघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागसेन नगरातील रहिवासी सुकलाल लक्ष्मण घोडके (वय ४५) यांनी १९ जानेवारी २०२१ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. फेब्रुवारीत प्रौढाने लिहीलेली सुसाइड नोट त्याच्या पत्नीस मिळाली. तर या सुसाइड नोटच्या आधारावर रविवारी त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मृत घोडके यांच्या आईच्या नावावर धानवड येथे २ हेक्टर ३२ आर क्षेत्रफळ असलेली जमीन आहे. ५ एप्रिल २०१८ रोजी ही जमीन खरेदी करण्यासाठी दलाल प्रकाश सुपडू माळी यांनी घोडके कुटुंबीयांना संपर्क केला. त्यानुसार शैलेंद्र वसंत चिरमाडे हे जमीन खरेदी करण्यास तयार झाले. ही जमीन ५ लाख ७५ हजार रुपयांत खरेदी करण्याचे ठरले. त्यानुसार सौदापावती करण्यात आली. सुरूवातीला २ लाख रुपये द्यायचे व उर्वरीत ३ लाख ७५ हजार रुपये खरेदीच्या वेळी देण्याचे ठरले होते. दरम्यान, चिरमाडे व माळी यांनी काही दिवसांनी घोडके यांच्या आईस केवळ ५० हजार रुपये दिले. जमीन खरेदीसाठी शासनाच्या परवानगीची गरज आहे. परवानगी घेण्यासाठी खर्च येणार असून तो आम्ही करु. झालेला खर्च मूळ रकमेतून कमी करुन तुम्हाला देऊ असे दोघांनी सांगीतले. परंतु, सौदापावती करताना अशी कोणतीही अट घातलेली नव्हती. यानंतर माळी व चिरमाडे यांनी जमीन खरेदीसाठी घोडके यांच्याकडे तगादा लावला. जमीन लवकर खरेदी करुन द्या, नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवून टाकू अशा धमक्या दोघांनी घोडके यांना दिल्या.

माळी आणि चिरमाडे यांनी दिलेल्या धमक्यांमुळे घोडके तणावात राहत होते. त्यांनी पत्नी शोभा व मुलगा हर्षल यांना देखील ही बाब सांगीतली होती. त्रास वाढल्यानंतर घोडके यांनी आत्महत्या केली. यानंतर फेब्रुवारीत त्यांच्या पत्नी शोभा यांनी घराची सफाई केली असता घोडके यांच्या शर्टच्या खिशातून एक सुसाइड नोट त्यांना मिळून आली आहे. यात त्यांनी याबाबतची माहिती लिहून ठेवली आहे. दरम्यान, मयत घोडके यांच्या वडीलांचे सन २०१६ मध्ये निधन झाले आहे. यावेळी त्यांनी माळी याच्याकडून व्याजाने १० हजार रुपये घेतले. वेळेत पैसे न देऊ शकल्यामुळे त्याने घोडकेंकडून तब्बल सव्वा लाख रुपये घेतले आहेत. असाही उल्लेख दाखल फिर्यादीत करण्यात आलेला आहे.

या संदर्भात शोभा घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चिरमाडे व माळी यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content