Exclusive जळगाव जितेंद्र कोतवाल । जिल्हाधिकार्यांच्या नंतर आता पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या बदलीचे संकेत मिळाले आहेत. त्यांच्या जागेवर तीन-चार अधिकार्यांच्या नावाची चर्चा असली तरी यात विश्वास पांढरे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोनामुळे सुरू असणार्या लॉकडाऊनमध्येच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली होती. तेव्हाच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची बदली होणार असल्याची चर्चा होती. तथापि, याबाबत नंतर काहीही हालचाली झाल्या नाहीत. मात्र आता उगले यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
ताज्या हालचालींचा मागोवा घेतला असता डॉ. पंजाबराव उगले यांची बदली होणार असल्याचे दिसून येत आहे. दस्तुरखुद्द डॉ. उगले यांचा देखील यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी ते मध्यंतरी मुंबईत जाऊन आले असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे. तर गृह मंत्रालयात जळगावच्या अधिक्षकपदाच्या नावावर मतैक्य झाले असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे डॉ. पंजाबराव उगले यांच्या जागी नेमके कोण येणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही अधिकार्यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. यात प्रामुख्याने विश्वास पांढरे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच राज्यातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्या होण्याची शक्यता असून यात जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून विश्वास पांढरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर डॉ. उगले हे मुंबई वा ठाण्यात बदील होऊन जातील अशी शक्यता आहे.