जळगाव (प्रतिनिधी) एप्रिल अखेरच्या हीटमुळे सध्या जळगावकर चांगलेच हैराण झाले असून या उष्म्यामुळे कृत्रिम थंड हवेसाठी कुलर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे. त्यामुळे एप्रिल, मे दरम्यान कुलर खरेदी करणा-या ग्राहकांच्या संख्ये मोठी वाढ झाली आहे.
जळगावातील तीव्र उन्हाळ्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठिण झाले आहे. दिवसभर कडकडीत उन आणि उष्णतेची लाट यामुळे सामान्यांना घराबाहेर पडणे कठीण होत चालले आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या तापमान ४५ अंश सेल्सिअस ते कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहेत. यामुळे जळगावकरांची काहिली होऊ लागली आहे. तापमान वाढू लागल्याने नागरिकांकडून कुलरची खरेदी होत असून, नामांकित कंपनीचे कुलरसोबतच स्थानिक उत्पादकांच्या डेझर्ट कुलरची मागणी वाढली आहे. डेझर्ट कुलर म्हणजे तिन्ही बाजूंनी फक्त लोखंडी आणि गवताच्या जाळीने आच्छादलेला कुलर असून, गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या तोंडावर अशा डेझर्ट कुलरची मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागल्याने शहरातील विविध भागात या कुलरचे उत्पादन होत आहे.
डेझर्ट कुलर हे कुलर्स नामांकित कंपन्यांच्या तुलनेत केवळ पंधराशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत परवडणाऱ्या किमतीत मिळतात. कुलरच्या आकारानुसार त्यात वाढ होते. यात दोन फुटांपासून ते चार फूट आकाराचे कुलर्स असतात. साधारणत: हे कुलर शंभर फुटांपासून सहाशे चौरस फूट हॉल अथवा खोलीसाठी पुरेसे असतात. त्याचप्रमाणे ग्राहकाच्या गरजेप्रमाणेही कुलर बनवून देत असल्याने नागरिकांकडून या कुलर्सला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. उन्हाळ्यात झोपडपट्टी व पत्र्याच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवतो. अशा वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना एसी बसविणे शक्य होत नाही. त्यामुळे साध्या डेझर्ट कुलर्सला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.