जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुसुंबा येथील ग्रामपंचायतीवर माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थक यमुनाबाई हिलाल ठाकरे या सरपंच बनल्या असून या माध्यमातून शिवसेनेच्या शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पहिला सरपंच बनण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील सरपंचपदाची निवडणूक आज पार पडली. यात माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थक पॅनलच्या यमुनाबाई हिलाल ठाकरे यांना १७ पैकी नऊ मते मिळून त्या सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यांना चंद्रकांत भावलाल पाटील, श्रावण शेनफडू कोळी, मीनाबाई अशोक पाटील, प्रमोद गंगाधर घुगे, अश्वीनी वाल्मीक पाटील, रामदास मारूती कोळी, बेबाबाई यासीन तडवी आणि संदलाबाई तडवी यांची मते मिळाली. यमुनाबाई ठाकरे यांची सरपंचपदी नियुक्ती जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार आतषबाजी करून जल्लोष केला.
माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच तथा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन भावलाल नामदेव पाटील व माजी सरपंच वत्सलाबाई शेनफडू कोळी यांच्या प्रयत्नांनी यमुनाबाई हिलाल ठाकरे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रियंका पाईपचे संचालक उद्योजक साहेबराव जगन पाटील, हिंमत नामदेव पाटील, वसंत नवल पाटील, राजाराम देवराम पाटील, लक्ष्मण पंडित पाटील, आकाश शांताराम पाटील उर्फ बंटी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्यातर्फे नवनिर्वाचीत सरपंच यमुनाबाई हिलाल ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
कुसुंबा येथील नवनिर्वाचीत सरपंच आणि त्यांचे पॅनल हे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. गुलाबभाऊ हे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे सरपंच यमुनाबाई ठाकरे यांच्या माध्यमातून शिंदे गटाचा जिल्ह्यातील पहिला सरपंच झाला असून कुसुंबा ग्रामपंचायतीवर या गटाचा झेंडा फडकला आहे.