मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 10 मार्चपर्यंत ‘यलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यानुसार नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांना वादळी वारे व गारपिटीसह पावसाचा तडाखा बसणार आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये वादळी वा-यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. औरंगाबादमध्येही मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल तसंच काही भागात गारपीटही होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
दक्षिण पूर्व अरबी समुद्रात केरळ किनाऱयापासून कोकण किनाऱयापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेचे वारे एकत्र वाहत आहेत. या हवामान बदलामुळे महाराष्ट्राच्या काही भागांत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहतील.