जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात दुसर्‍या टप्प्यात होणार्‍या सहा नगरपालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुका ८ जुलै रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या. यात भुसावळ, अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, वरणगाव, यावल, फैजपूर, चाळीसगाव आदींचा समावेश होता. तर, उर्वरित सहा नगरपालिकांची निवडणूक दुसर्‍या टप्यात होणार असल्याचे घोषीत करण्यात आले होते. मात्र बदलत्या राजकीय स्थितीत १४ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांना स्थगिती दिली. तर नंतर सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणावर शिक्कामोर्तब केले. यानंतर आता दुसर्‍या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीची निवडणूक घोषीत होण्याआधीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. यातील महत्वाचा टप्पा म्हणजे आरक्षण होय.

जिल्हा प्रशासनाने आता चोपडा, पाचोरा, भडगाव, सावदा, रावेर आणि नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नशिराबाद या सहा नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात २८ जुलै रोजी स्थानिक पातळीवर आरक्षणाची सोडत निघणार आहे. यात एस. सी. आणि एस.टी. आरक्षण आधीप्रमाणेच अर्थात १३ जून २०२२ रोजी जाहीर केल्यानुसार राहणार आहे. तर यात आता ओबीसी अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण काढण्यात येणार आहे. या आरक्षणामुळे राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याने या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content