जळगाव प्रतिनिधी | शहरातील अजिंठा चौफुलीवरील सर्कलला सरदार वल्लभभाई पटेल आणि मीर शुक्रुल्ला यांच्या नावाचे फलक लावणार्या दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अजिंठा चौकातील रोटरी सर्कलवर मीर शुक्रुल्ला व सरदार वल्लभभाई पटेल या दोघांच्या नावाचे फलक लावण्यासाठी दोन गटांनी विनापरवानगी आंदोलन केले. याप्रसंगी वाद देखील निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फलक काढून घेतले होते.
दरम्यान, या प्रकरणी शासनाने कोरोनासाठी जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन दोन्ही गटांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. दोन्ही गटांच्या ४० जणांवर दंगलीसह साथरोग अधिनियम कायद्याचे उल्लंघन केल्याचे कलम लावण्यात आले आहेत.
याच्या अंतर्गत पोलिस कर्मचारी विश्वास बोरसे यांच्या फिर्यादीवरून नाजीम मीर, सय्यद दानिश शकील अहमद, शेख अहमद हुसेन, इम्रान हुसेन, मोहंमद इम्रान अब्दुल गनी शेख, रेयान जहागीरदार, शेख शाकीर शेख अजिज, आसिफ शेख फारुख बादलीवाला यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल झाला.
यासोबत पोलिस कर्मचारी मंदार पाटील यांच्या फिर्यादीवरून विष्णू भंगाळे, सुनील सुपडू महाजन, ललित कोल्हे, ललित चौधरी, आशुतोष चुडामण पाटील, मुकुंदा कोळी यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख व नीलेश गोसावी हे करीत आहेत.