जळगाव प्रतिनिधी | शहरातील जुने बस स्थानकाच्या मागील मनीष कॉम्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर आज पोलीस पथकाने धाड टाकून धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर भादू महाजन यांच्यासह इतरांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगाव शहरातील जुने बसस्थानकाच्या पाठीमागे मनिष कॉम्लेक्सच्या तिसर्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यात धरणगावच्या माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर भादू महाजन (वय ५३,रा.मोठा माळीवाडा, धरणगाव) यांच्यासह ९ जणांना ताब्यात घेण्यात येवून त्यांच्याकडून रोख रक्कम व वाहने मिळून ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पहाटे चार वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे रुस्तम तडवी यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर भादू महाजन (रा.धरणगाव), भूषण रामा माळी (वय २४, रा.धरणगाव), दिनेश दिलीप धोबी (वय २४,रा.मेहरुण), मनोज जयराज जयंतीलाल (वय ६०,रा.नवी पेठ), रोहित संजय पवार (वय २६,रा.गणेश कॉलनी), ज्ञानेश्वर बुधा चौधरी (वय ५६,रा.धरणगाव), गणेश आत्माराम महाजन (वय ३२,रा.धरणगाव), गुलाब लखीचंद सपकाळे (वय ३०,रा.सावखेडा,ता.जळगाव) व लोकेश विनोद झंवर (वय ३२,रा.भोकर, ता.जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत ज्ञानेश्वर महाजन यांची चारचाकी तसेच रोख रक्कम, मोबाईल, मोबाईल व इत वाहने असा ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास उमेश भांडारकर हे करीत आहेत.