जळगाव प्रतिनिधी । जि.प. सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी पाठपुरावा केलेल्या जिल्हा परिषदेतील जलसंधारण विभागात झालेल्या गौण खनिज घोटाळ्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू झाली आहे. तर याच प्रकरणात जिल्हा जलसंधारण अधिकारी एस.एल.पाटील यांच्याकडील पदभार काढून घेण्याचा निर्णय जि.प.च्या जलव्यवस्थापन समितीने घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची ऑनलाईन सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी समितीच्या मागील बैठकीत प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एल. पाटील यांना त्या पदावरून दूर करण्याचा ठराव करण्यात आला होता. दरम्यान, अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी लक्षात आणून दिली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी बैठकीतील या क्षणापासून त्यांचा पदभार काढण्यात येत असल्याचे जाहीर केले. तातडीने त्यांना प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी या पदावरून दूर करण्यात आले.
गौण खनिज घोटाळा प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्यांना पुरवण्यात आलेली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणात पोलिसांकडून संबधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे पल्लवी प्रमोद सावकारे यांनी या बैठकीत सांगितले.