जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आगामी काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्व तयारीस जिल्हा प्रशासनाने प्रारंभ केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे. या महिन्यात नोव्हेंबरमध्ये नगरपालिका तर पुढील फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या अनुषंगाने जि.प. व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी गट व गणांची माहिती संकलन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनास दिले आहे.त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यातील तहसीलदारांना ही माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहे.
जिल्हा परिषदेत सध्या ६७ गट व १३४ गण कार्यरत आहे. यात नवीन लोकसंख्येनुसार बदल होण्याची शक्यता आहे. यात नशिराबाद- भादली गट कमी होण्याची शक्यता आहे. पुढील निवडणूका घेण्यासाठी सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी लोकसंख्येची माहिती संकलित करण्याचे काम सुुरु करण्याचे पत्र उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी तहसीलदारांना आठवड्यापूर्वी दिले आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येंमधून नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका, नगरपंचायती तसेच महानगरपालिकेच्या हद्दवाढ क्षेत्राची लोकसंख्या वगळून तालुकानिहाय ग्रामीण लोकसंख्येची माहिती प्रमाणित प्रपत्रामध्ये पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात तालुक्यातील ग्रामीण एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या यासह उदघोषित झालेल्या नगरपरिषदा, नगरपंचायती यांची तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येतून वगळावी लागणारी लोकसंख्या ही माहितीही मागविण्यात आली आहे.