जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील बहुतांश कर्मचार्यांच्या स्मार्टफोनवर एकाच वेळी अश्लील मॅसेज आल्याचा प्रकार घडला असून या संदेशात एका महिला कर्मचार्याचा क्रमांक टाकण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत अनेक कर्मचार्यांच्या मोबाइलवर मंगळवारी एकाच वेळी एकाच मोबाइल क्रमांकावरुन अश्लील संदेश आले. यात एका महिला कर्मचार्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. तसेच त्या महिलेचा मोबाईल क्रमांक देखील टाकण्यात आला आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिस कर्मचार्यांनी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांची भेट घेऊन तक्रार केली. यानंतर संबधित मोबाइल क्रमांकाचा तपास घेण्यात आला. हा मोबाईल क्रमांक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या अनुषंगाने आता पोलीसांनी चौकशीस प्रारंभ केला आहे.