रावेर प्रतिनिधी | संपूर्ण राज्याला हादरवून टाकणार्या तालुक्यातील बोरखेडा येथील चौघा भावंडांच्या हत्येची यशस्वी उकल करून आरोपींना गजाआड करणारे तपास अधिकारी कुमार चिंथा, तत्कालीन एलसीबी प्रमुख बापू रोहोम, रावेरचे एपीआय शीतलकुमार नाईक आणि हवालदार बिजू जावरे यांना पोलीस महासंचालकांनी पारितोषीक देऊन गौरविले आहे.
महाराष्ट्राभर गाजलेल्या बोरखेडा हत्याकांड प्रकरणाचा सर्वात उत्कृष्ट गुणात्मक तपास केल्याने महाराष्ट्र पोलीस महासंचालक (सिआयडी) तर्फे गौरवण्यात आल्याने महाराष्ट्राभर जळगाव पोलिस विभागाला सन्मान लाभला आहे.
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे चार भावंडाची हत्या झाली होती. यामुळे हे प्रकरण महाराष्ट्राभर गाजलेले होते. त्यावेळी घटनेच गांभीर्य लक्षात घेत तत्कालीन गृहमंत्री अनिल देखमुख यांनी रावेर येथे घटनास्थळी भेट दिली होती. या गुन्ह्यासंदर्भात सन २०२० मध्ये रावेर पोलीस स्टेशन येथे भाग ५ गु.र.नं. १८८/२०२० भा.द.वि.क.३०२, ३७६ अ, ४५२, २०१ पोक्सो क.४, ६, ८, १०, १२ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा सर्वात उत्कृष्ट गुणात्मक तपास केल्याबाबत पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे तसेच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस अधिक्षक जळगाव भाग कुमार चिंथा तसेच तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस निरिक्षक बापू रोहोम, रावेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक आणि पोहेकॉ बिजू फत्तू जावरे यांची शिफारस केली होती. त्यांना आज सोमवार, दि.१७ जानेवारी रोजी अप्पर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ठ प्रयत्न केले म्हणून १०.००० रुपयाचे बक्षिस देऊन गौरविले. त्यांचे जळगाव पोलिस विभागाकडून अभिनंदन केले जात आहे.