जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जास्त परतावा देण्याच्या आमिषातून अनेकांची फसवणूक करणार्याला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजकुमार नारायण पाटील (रा. कोल्हे हिल्स परिसर, जळगाव) याने जितेंद्र बाबूराव सोनवणे ( रा. डी.डी. नगर, एन.एस. हायस्कूलच्या पुढे, पारोळा) व हिरालाल दौलत पाटील (रा. १५५, प्रभातनगर, बिलाडीरोड, देवपूर, धुळे) यांनी इ ऍन यू ( एज्युकेशन फॉर यू सेल्स ऍण्ड सर्व्हिसेस ) नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी मोठा परतावा, भेटवस्तू व आकर्षक बक्षिसे यांचे आमिष दाखवले. यासाठी मल्टी लेव्हल मार्केटींगची अट टाकण्यात आली होती.
दरम्यान, या आमिषांना बळी पडून ठेवीदारांनी अनेक लोकांकडून पैसे घेतले; परंतु त्यांना कोणतीही पावती देण्यात आली नाही. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ठेवीदारांनी पैशांसाठी तगादा लावला. यामुळे या तिघांनी कंपनी बंद करून इंटरनेटवरून संपूर्ण माहिती डिलीट केली. धुळे शहरात सुमारे ३६ लाख रुपयांची फसवणूक त्यांनी केली होती. याप्रकरणी वर्षभरापूर्वी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर हा गुन्हा तपासासाठी धुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित राजकुमार नारायण पाटील हा फरार झाला होता. त्याच्या वास्तव्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देव्हडे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने सापळा रचून जिल्हा परिषद परिसरातून राजकुमार याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला धुळे पोलिसांकडे दिले आहे. या घोटाळ्यात कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. तसेच राजकुमार पाटील याच्या अटकेमुळे आता उर्वरित दोन्ही संशयितांच्या अटकेची शक्यता देखील बळावली आहे.