जळगाव प्रतिनिधी । राज्य सरकारतर्फे लॉकडाऊन जाहीर होईल तोवर जिल्ह्यात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नियमाचे पालन करत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन केली. याप्रसंगी जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
राज्य सरकार लवकरच लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमिवर, व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले की, ब्रेक द चेन अंतर्गत बहुतांश दुकाने मागील सहा दिवसा पासून बंद आहेत. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी मार्चअखेरचे सर्व कामे व मागील महिन्याचे मंथली जीएसटी रिटर्न, जीएसआर, डीटीएस टॅक्स भरणा आदी सर्व कामे थांबले आहेत. त्याची मोठ्या प्रमाणात दंड लागण्याची शक्यता आहे. तसेच गुढीपाडवा व रमजान हे मोठे धार्मिक सण साजरे करता यावे म्हणून मोठ्या प्रमाणात मालाचा साठा व्यापार्यांनी केलेला आहे. दरम्यान, संपूर्ण लॉकडाऊनला महाराष्ट्रातील सर्व व्यापारी असोसिएशनने पाठींबा देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउन जाहीर होईपर्यंत जळगाव शहर व जिल्ह्यासाठी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्व नियमांचे पालन करुन दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.
शिष्टमंडळात राज्य कॅट असोसिएशनचे राज्य वरिष्ठ उपाध्याय पुरुषोत्तम टावरी, राज्य उपाध्याय दिलीप गांधी, सचिव प्रविण पगारिया, जिल्हा अध्यक्ष संजय शाह यांचा समावेश होता.
या वेळी आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, आमदार संजय सावकारे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी आमदार स्मिता वाघ, शंकर लालवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.