जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचा ना. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाच्या निर्देशानुसार आजपासून जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेस राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

राज्य शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२च्या दरम्यान स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्याचे जाहीर केले आहे. जळगाव जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ जळगाव तालुक्यातील सावखेडा या गावातील कार्यक्रमात करण्यात आले. राज्याचे पाणी पुरवठ व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नियोजन प्रकल्प संचालक जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, सरपंच उषाबाई सपकाळे, विकासो चेअरमन जितू पाटील, अरविंद सपकाळे, तालुका राजेंद्र चव्हाण, माजी सभापती जनाआप्पा पाटील, डॉ, कमलाकर पाटील, नारायणआप्पा सोनवणे, रवींद्र चव्हाण सर, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी श्री राऊत आणि श्री. जंगले; केंद्रप्रमुख युवराज परदेशी, मुख्याध्यापक अरूण चौधरी, अनिल भोळे, गोपाल जीभाऊ, पोलीस पाटील आनंदबापू पाटील, दिलीप आगीवाल, मच्छींद्र पाटील, लिलाधर पाटील, घाडी सरपंच; फुफणी सरपंच कैलास सपकाळे, आव्हाण्याचे सरपंच ज्ञानेश्‍वर चौधरी, विनोद सपकाळे, धानोरा सरपंच देवेंद्र पाटील, परिसरातील सरपंच, लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षकवृंद, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर उपस्थितांना स्वच्छता व श्रमदानाची शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन प्रवीण चौधरी सर यांनी केले. आभार गटविकास अधिकारी सुशांत पाटील, प्रास्ताविक प्रकल्प नियोजन संचालक नेहा कुडचे यांनी केले. त्यांनी दृश्यमान स्वच्छतेबाबत सविस्तर माहिती. तसेच कार्यक्रमाबाबतची माहिती दिली.

या कार्यक्रमात सुका कचरा व ओला कचरा याचचे संकलन करण्यासाठी ग्रामपंचायतीला कचराकुंड्या देण्यात आल्या. तर या कचर्‍याचे वहन करण्यासाठी सायकलींचे वाटप देखील करण्यात आले. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी याप्रसंगी सादर केलेल्या विविध पाककृतींची पाहणी करून मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. तर कार्यक्रमानंतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तीक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्वाचे घटक आहेत. उपलब्ध पाणी, स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधा या तिन्ही बाबी याचमुळे अतिशय महत्वाच्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रीतपणे २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पोहचवण्याचा संकल्प केलेला आहे. यालाच आता स्वच्छता ही सेवा या अभियानाची जोड मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी पातळीवर स्वच्छता ही महत्वाची आहे. यात सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व घनकचरा व्यवस्थापन, गटारींसह मलनि:सारणाची व्यवस्था या बाबी अत्यावश्यक आहेत. या खात्यांचा मंत्री म्हणून मी या तिन्ही बाबींना गती देण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वच्छता ही सेवा मोहिम याला बळ देणारी ठरावी ही अपेक्षा ना. पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, स्वच्छता ही सेवा या मोहिमेच्या अंतर्गत येत्या १५ दिवसांच्या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे यात गावांमध्ये दृष्यमान स्वच्छता,गावातील कचराकुंड्या आणि असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणे,कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी कचरा विलगीकरण करण्यासाठी जनजागृती करणे,कचरा संकलन आणि कचरा विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे,प्लास्टिक सारखा अविघटनशील कचरा एकत्रित करून नियोजन करणे,पाणवठ्या जवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण, एकल प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामाबद्दल सभा आयोजित करून यापूर्वी प्लास्टिक वापरावर बंदी बाबत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे,हागणदारी मुक्त अधिक घटकांवर सरपंच संवाद आयोजित करणे, घोषवाक्य लेखन, प्रतिज्ञा घेणे,कचरा न करणे ,प्लास्टिक बंदी व स्वच्छता या विषयावर वकृत्व निबंध, रांगोळी सजावट व देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी गणेश मंडळांना आवाहन करणे यांचा समावेश राहणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

या कार्यक्रमाचे आभार गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मानले.

Protected Content