जळगाव प्रतिनिधी । एकीकडे बीएचआर प्रकरणात सुनील झंवर व जितेंद्र कंडारे यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नसतांनाच झंवर याने फिर्याद रद्द व्हावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर या दोघांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडे छापे मारण्यात आले आहेत.
बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील झंवर व तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यांना अटक करण्यात अजूनही पोलिसांना यश मिळाले नाही. २४ नोव्हेंबर २०२० रोजी पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून झंवर, कंडारे यांच्यासह अनेक जणांवर बीएचआर घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे दोघे प्रमुख संशयित तेव्हापासून बेपत्ता आहेत. १२ फेब्रुवारी रोजी पुणे न्यायालयाने झंवर व कंडारे यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भातील नोटीस त्यांचे घर, कार्यालय, सार्वजनिक जागांवर डकवण्यात आल्या आहेत. दोघांना ३० दिवसांच्या आत म्हणजेच १४ मार्चपर्यंत न्यायालयात शरण येण्याची संधी देण्यात आली आहे. यातच आपल्या विरोधात दाखल केलेली फिर्याद रद्द करावी यासाठी सुनील झंवर याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, या दोन्ही आरोपींच्या जवळच्या नातेवाइकांच्या घरांवर २७ फेब्रुवारी रोजी एकाच वेळी नऊ ठिकाणी छापेमारी करून दोघांचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील चार, इंदूर येथील तीन तर जळगावातील दोन अशा नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे.