जळगाव प्रतिनिधी । यशवंत पंचायतराज मूल्यांकनात जळगाव जिल्हा परिषद उत्तर महाराष्ट्रातून प्रथम आली असून आता सोमवारी राज्यस्तरीय पंचायतराज समिती पाहणी करण्यासाठी येणार आहे.
यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यांकनात जळगाव जिल्हा परिषद नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत अव्वल ठरली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ग्राम विकास विभागाने ङ्गयशवंत पंचायत राज अभियानफ सुरू केले असून त्यात विभागस्तरावर आणि राज्यस्तरावर पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात नाशिक विभागात जिल्हा परिषद गटात जळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर राहाता पंचायत समिती सर्वोत्कृष्ट ठरली आहे. सन २०१९-२० या वर्षासाठी नियु्क्त समितीने नुकतीची ही घोषणा केली आहे. विभागस्तरावर पहिला क्रमांक मिळवणार्या या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे राज्यस्तरीय स्पर्धेत मूल्यांकन करण्यासाठी १ मार्च रोजी राज्यस्तरीय समिती जळगावात येणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे या पडताळणीसाठी जळगाव जिल्हा परिषदेत येणार आहेत. त्यानंतर त्या राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाकडे अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर राज्यस्तरावर पहिल्या तीन जिल्हा परिषदांना पारितोषिक देऊन गौरवले जाणार आहे.