जळगाव प्रतिनिधी – जिल्हा रूग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत अद्ययावत माता व बालसंगोपन केंद्र (एमसीएच विंग) उभारण्यात येणार असून याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये या प्रकारच्या केंद्रांना मंजुरी मिळाली असून यात जळगावचा समावेश आहे. तब्बल ३३ कोटी १५ लक्ष ९ हजार रूपयांची तरतूद असणार्या या केंद्रामुळे नवजात शिशूंसह मातांना अद्ययावत उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या केंद्राला मंजुरी मिळाली असून याच्या कामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे.
ना. गुलाबराव पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा रूग्णालयात सद्यस्थितीत नवजात शिशूंसह मातांच्या संगोपन व उपचाराची व्यवस्था असली तरी अद्याप येथे अत्याधुनीक उपचार उपलब्ध नव्हते. या बाबींची दखल घेत, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी २०१८ मध्ये जिल्हा रूग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत भव्य माता व बालसंगोपन केंद्र उभारण्यात यावे यासाठी पत्र दिले होते. यानंतर ना. पाटील यांनी संबंधीत प्रकल्पाचा वेळोवेळी पाठपुरावा सुरू केला होता. तर यानंतर अलीकडेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी सुध्दा आरोग्य खात्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता.
मिळाली मान्यता
आज राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये माता व बाल संगोपन केंद्राला (एमसीएच विंग) मंजुरी दिली असून यात जळगावचा समावेश असून अहमदनगर, नंदुरबार, नाशिक, अकोला, जालना, सातारा, गडचिरोली, लातूर, सांगली, कोल्हापूर, व सोलापूर या जिल्ह्यांचाही समावेश आहे. जळगाव साठी ३३ कोटी १५ लक्ष ९ हजार रूपयांची निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
मध्यवर्ती ठिकाणी वैद्यकीय सेवा
सध्याचे जिल्हा रुग्णालय हे जळगाव शहराचे मध्यवर्ती भागात असून रेल्वे स्टेशन एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय आकडे संदर्भित होणार्या अत्यावश्यक माता व बालकांचे सोयीसाठी नवजात बालके आयसीयू वॉर्डमध्ये दाखल होणारे गंभीर रुग्ण इत्यादी यांना चांगल्या प्रकारे रुग्णालयीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिला व बाल रुग्णालय उपयुक्त ठरणार आहे.
तीन मजली केंद्र
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत उभारण्यात येणारे अद्ययावत माता व बालसंगोपन केंद्र (एमसीएच विंग) सिव्हील हॉस्पीटलच्या आवारातील अलीकडेच काढण्यात आलेली अतिक्रमणे व जुनी निवासस्थाने काढून रिक्त होणार्या तब्बल सहा एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. या तीन मजली केंद्रात माता आणि नवजात शिशूंवर अद्ययावत उपचार उपलब्ध राहणार आहेत.
गोरगरिबांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा
या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, एमसीएच विंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब महिला व त्यांच्या शिशूंना उत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहे. यासाठी निधीची निधीची कमतरता भासू देणार नसून लवकरच याच्या कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.