जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे आधीच किरकोळ व्यावसायिक अडचणीत आले असतांना महापालिका प्रशासन आठमुठेपणा करत असल्यामुळे आता आम्ही खावे तरी काय ? असा सवाल गाळेधारकांच्या कुटुंबातील महिलांना उपस्थित केला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून त्यांनी प्रशासनाचा निषेध केला.
याबाबत वृत्त असे की, महापालिकेच्या मालकीच्या असणार्या व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा प्रश्न आता खूप चिघळला आहे. यामुळे गाळेधारकांनी साखळी आंदोलन सुरू केले आहे. याच्या अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाळेधारकांच्या कुटुंबातील महिलांनी निषेध आंदोलन केले.
याप्रसंगी घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध केला. तर, आंदोलक महिलांनी अतिशय पोटतिडकीने आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, आधीच लॉकडाऊनमुळे लहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत. व्यवसाय खूप कमी झालेला आहे. अगदी दिवसाला दोन-तीनशे रूपये मिळणे देखील कठीण झालेले आहे. यातच महापालिका प्रशासन आता गाळेधारकांना वेठीस धरत आहे. आमचा व्यवसाय होत नसतांना गाळ्यांसाठी तगादा लावणे, लिलावाची धमकी देणे या बाबी गैर आहेत. आता आम्ही आणि आमच्या कुटुंबाने जगावे तरी कसे ? आम्हाला खायला तरी मिळणार का ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. भास्कर मार्केट, शामाप्रसाद मुखर्जी मार्केट आणि इतर मार्केटमधील गाळेधारकांच्या कुटुंबातील महिला यात सहभागी झाल्या होत्या.
खालील व्हिडीओत पहा गाळेधारकांच्या कुटुंबातील महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/5595443560528291