जळगाव प्रतिनिधी । भर दिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून १५ लाख रूपयांची लूट करणार्या दोन्ही चोरट्यांच्या मागावर एलसीबी व एमआयडीसी पोलिसांचे पथक असून लवकरच ते जाळ्यात अडकतील अशी शक्यता आहे.
१ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन चोरट्यांनी दुचाकीवरुन पैसे घेऊन जात असलेल्या महेश भावसार, संजय विभांडीक व नागरिकांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत १५ लाख रुपये घेऊन घटनास्थळावरून पलायन केले होते. यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला. काही तासांमध्येच धुळे येथील मुकेश मोकळ व विक्की राणा या दोन भामट्यांनी हे कृत्य केल्याची माहिती शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. यानंतर या दोघांचा तपास सुरू झाला.
हे दोन्ही जण धुळ्यावरून गुजरात राज्यात निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या अनुषंगाने एक पथक आता त्यांच्या गुजरातमध्ये शोध घेत आहे. या पथकात एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही भामटे सुरतमध्ये असण्याची शक्यता असून पथकानेही याच दिशेने तपास सुरू केला असून लवकरच ते जाळ्यात सापडण्याची शक्यता आहे.