जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत Nutan Maratha अर्थात मविप्रवर दिवंगत नरेंद्र अण्णा पाटील यांच्या गटाचाच हक्क असल्याचा महत्वपूर्ण निकाल आज जिल्हा न्यायालयाने दिला आहे. यात अॅड. विजय भास्कर पाटील यांनी दिलेल्या कायदेशी लढाईला यश लाभले आहे. जाणून घ्या जिल्हा न्यायालयाने नेमक्या कोणत्या मुद्यावरून पाटील गटाच्या बाजूने निकाल दिला ते ?
जळगाव जिल्हा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत Nutan Maratha या संस्थेच्या २०१५ साली झालेल्या निवडणुकीत नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय संपादन केला होता. यानंतर मात्र भोईटे गटाने पुन्हा एकदा समांतर कार्यकारिणी स्थापन करून संस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यातून वाद झाले होते. यात दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरूध्द तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. तर हा वाद नंतर न्यायालयात पोहचला होता. या संदर्भात अॅड. विजय भास्कर पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली.
अॅड. विजय पाटील म्हणाले की, आम्ही विजयी झाल्यानंतर काही दिवस कार्यभार पाहिला. नंतर मात्र भोईटे गटाने बळजबरीने Nutan Maratha संस्थेमध्ये प्रवेश मिळवत समांतर कार्यकारिणी सुरू केली. या पार्श्वभूमिवर सीआरपीसी १४५ कलमान्वये या दोन्ही गटांच्या वादावर निर्णय घ्यावा असा प्रस्ताव पोलिसांनी तहसीलदारांकडे पाठविला होता. त्यावर तहसीलदारांनी नरेंद्र पाटील गटाच्या बाजूने निर्णय दिला होता.
अॅड. पाटील पुढे म्हणाले की, कालांतराने तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांवर दबाव टाकून फेरविचाराचा प्रस्ताव पोलिसांकडूनच तहसीलदारांकडे पाठविण्यास भाग पाडले होते. मात्र फेरविचाराच्या प्रस्तावात वादाची पार्श्वभूमि पुर्वीसारखीच होती. त्यात कोणतीही असाधारण अथवा अपवादाची परिस्थिती पोलीस नमूद करू शकले नव्हते. या फेरविचाराच्या प्रस्तावावर तहसीलदारांनी भोईटे गटाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर तहसीलदारांच्या या दुसर्या निर्णयाला विजय भास्कर पाटील यांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.
संस्थेतील वादाची पार्श्वभूमि काहीच बदललेली नसतांना आणि पहिल्यांदा दिलेले आदेश निष्प्रभ झालेले नसतांना एकाच तहसीलदाराने एकाच मुद्यावर दोन वेगळे आदेश का दिलेत ? अशी बाजू पाटील गटातर्फे न्यायायापुढे मांडण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने पुन्हा या संस्थेवर नरेंद्र पाटील यांच्या गटाचेच संचालक मंडळ वैध असल्याचा निकाल आज दिला. अर्थात, यामुळे दिवंगत नरेंद्रअण्णा पाटील आणि अॅड. विजय भास्कर पाटील यांच्या प्रयत्नांना यातून यश मिळाले आहे.