जळगाव प्रतिनिधी । शहरातील मयूर कॉलनीत एका तरूणाने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून तिची क्रूर हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, योगिता मुकेश सोनार (वय ३९, रा. मयूर कॉलनी) या आपली सासू आणि दिरासह राहतात. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश सोनार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे ते आपल्या आठ वर्षाच्या मुलासह दीर आणि सासूसोबत वास्तव्याला होत्या. दरम्यान, मध्यंतरी घरात नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते.
आज अशाच प्रकारचा वाद योगिता आणि त्यांचा दीर दीपक लोटन सोनार (वय ३८) यांच्यात झाला. यामुळे संतापलेल्या दीपकने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घातले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दीपकला रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.