जळगाव प्रतिनिधी । घरफोड्या करणार्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांनी ज्वेलरीच्या दुकानात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
भुसावळ व पहुर-पाळधी येथील तरुण जिल्ह्यात चोरी, घरफोडी करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, पंकज शिंदे, परेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, मुरलीधर बारी यांच्या पथकाने सुरुवातीला आकाश जाधव याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यात त्याने भुसावळ शहरात राजमल ज्वेलर्स येथे घरफोडी व दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात सिद्धांत म्हस्केदेखील सहभागी असल्याची माहिती आकाश याने दिली. त्यानुसार पथकाने म्हस्के यालाही ताब्यात घेतले.
मोहित उर्फ आकाश नरेंद्र जाधव (वय २२, रा. पहुर पाळधी, ता. जामनेर) व सिद्धांत उर्फ सोनू अरुण म्हस्के (रा. रेल्वे कॉलनी, कंडारी, भुसावळ) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या दोघांची गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून आणखी काही घरफोड्या, चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता आहे.