‘त्या’ वाढदिवसाची चौकशी करा : कामगार सेनेची मागणी

जळगाव प्रतिनिधी । एस.टी. महामंडळाच्या जळगावचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी भारतीय कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.

एस.टी. महामंडळाच्या जळगावचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी २३ फेबु्रुवारी रोेजी सर्व नियमांचे उल्लंघन करून आपला वाढदिवस ऑन ड्युटी धुमधडाक्यात साजरा केल्याचा गौप्यस्फोट माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केला होता. यानंतर आता भारतीय कामगार सेनेचे प्रसिध्दी सचिव जी.बी. पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार केली आहे.

या संदर्भात केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, कोरोना आजारामुळे आधीच डबघाईला आलेल्या महामंडळास अजून धक्का बसेल अशीच एक बातमी समजली आहे की जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांचा दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने देवरे यांनी विभागीय कार्यालयातील अनेक कर्मचार्‍यांना तसेच विविध डेपोंच्या डेपो मॅनेजर यांना बांभोरी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे सकाळी विभाग नियंत्रक कार्यालयातच सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर उपस्थित कर्मचारी व अधिकार्‍यांनी हजेरीपटावर सही करून दुपारी बारा वाजे पासून साडेचार दरम्यान बांभोरी गावाजवळील हॉटेलमध्ये पार्टीस उपस्थित होते.

यादरम्यान ऑफिस मध्ये संबंधित अधिकार्‍यांनी व इतरांनी सही करून दिवस भरून घेतल्याची माहिती मिळाली आहे. एकीकडे एसटी महामंडळाच्या विकासासाठी सर्वसामान्य कर्मचारी अहोरात्र परिश्रम करीत असताना काही अधिकार्‍यांकडून असे कृत्य करणे पूर्णतः चुकीचे वाटते. यापूर्वीही राजेंद्र देवरे यांच्या संदर्भात अनेक तक्रारी केल्या गेलेले असून अद्यापही अपेक्षित कार्यवाही न झाल्याचे दिसून आले आहे.

यात पुढे म्हटले आहे की, मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात आलेल्या विविध पाहुण्यांनी मांसाहारावर ताव मारला असून ड्युटी च्या कालावधीत काम न करून एसटी महामंडळाचे नुकसान केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यासंदर्भात व्यवस्थापकीय संचालक व संबंधित अधिकार्‍यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून गैरकृत्य केल्याबाबत तपासणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Protected Content