जळगाव प्रतिनिधी । जळगाव पीपल्स सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली असली तरी आपण आधीच या प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून या प्रकरणी ३ मे रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती चंद्रशेखर देवीदास अत्तरदे यांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगाव पीपल्स को ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी १४ जागांसाठी २७ सभासदांनी नामनिर्देशन पत्र घेतल्यावर २४ सभासदांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. नामनिर्देशनपत्रांची छाननीमध्ये ९ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. तर, एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने १४ उमेदवारांचे अर्ज बाकी राहिल्याने सदर १४ उमेदवार बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज ऑनलाइन सभेमध्ये जाहीर केले. बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांची २०२१-२०२६ या कालावधीकरिता निवडणूक प्रक्रिया सहकारी संस्था सांगली जिल्हा उपनिबंधक एन. डी. करे यांच्याकडून राबविण्यात आली.
या निवड प्रक्रियेमध्ये भालचंद्र पाटील, प्रकाश कोठारी, चंद्रकांत चौधरी, सुनील पाटील, रामेश्वर जाखेटे, प्रविण खडके, ज्ञानेश्वर मोराणकर, अनिकेत पाटील, चंदन अत्तरदे, विलास बोरोले, सुहास महाजन, स्मिता पाटील, सुरेखा चौधरी, राजेश परमार यांची निवड बिनविरोध करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
दरम्यान, याबाबत आधीच उच्च न्यायालयात धाव घेतलेले चंद्रशेखर देवीदास अत्तरदे यांनी ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजकडे त्यांनी आपण या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल ( याचिका क्रमांक ६१५३/२०२१ )केली असून यावर ३ मे रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे हायकोर्टातील सुनावणी नंतरच या निवडणुकीबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.