जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल लवकर मिळावे अशी मागणी महापौर भारतीताई सोनवणे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगाव शहरात कोरोना संशयितांची महानगरपालिकेकडून आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्याचे तपासणी स्वॅब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणा कमी पडत असल्याने अहवाल उशीरा येत आहे. अहवाल लवकरात लवकर मिळावे यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देऊन कार्यवाही करण्याची मागणी महापौर भारती सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
महापालिकेकडून दररोज सरासरी २०० संशयितांचे आरटीपीसीआर स्वॅब आपल्याकडे पाठविण्यात येत आहे. दररोज सरासरी केवळ ६० लोकांचे अहवाल मनपाला प्राप्त होतात. रुग्णांचे अहवाल ५ दिवस उशिरा येत असल्याने संशयित रुग्ण परिवारात आणि बाहेर इतरांमध्ये मिसळत असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक वाढतो. यामुळे चाचणीचे अहवाल लवकर मिळाल्यास कोरोनाचा प्रतिकार करणे सुलभ होईल असे महापौरांनी नमूद केले आहे.