जळगाव प्रतिनिधी । अयोध्या येथे उभारण्यात येणार्या भव्य श्रीराम मंदिरात सर्वसामान्य नागरिकांचाही हातभार लागावा या हेतूने निधी संकलनास प्रारंभ करण्यात आला आहे.
अयोध्येत श्रीराम मंदिरासह विविध वास्तूदेखील बांधण्यात येणार आहेत. यासाठी निधी संकलन करण्यात येत असल्याने देशभरात पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याने येण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उद्योजक अशोक जैन यांनी केले. तर कार्यक्रमाला उपस्थित सर्व श्रीराम भक्तांनी जास्तीत जास्त निधी संकलित करून हा संकल्प पूर्ण करण्याचा निश्चयही केला.
जळगाव जिल्ह्यातून निधी संकलनाचा शुभारंभ नुकताच जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते झाला. या वेळी जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, जिल्हा संघचालक डॉ. नीलेश पाटील , देवेंद्र भावसार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आयोजकांनी डिजिटल स्क्रीनद्वारे अयोध्येतील श्रीराम मंदिराचा आराखडा व मंदिराच्या उभारणीची माहिती दिली. तसेच जिल्हाभरात प्रत्येक गावातून निधी संकलनासाठी येत्या रविवारपासून सुरुवात होणार असून, प्रत्येक गावात संकलनासाठी समिती नेमणार आहे. रूपये शंभरपासून ते १ हजारपर्यंत निधी देणगी देणार्यांना पावती देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, निधी संकलनाकरिता श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीची स्थापना करण्यात आली. यात अध्यक्षपदी अमळनेर येथील प्रसाद महाराज, कार्याध्यक्ष उद्योजक अशोक जैन, उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, रोहित निकम, ज्ञानेश्वर माऊली, कोषाध्यक्ष सुधीर मराठे, सहकोषाध्यक्ष अतुल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मंगेश महाराज जोशी, भगवानदास महाराज, ग्यानी गूरूप्रीतसिंह महाराज, डॉ. नीलेश पाटील, हरिष मुंदडा, नीरज अग्रवाल, रमेश मोरे, गोपाल अग्रवाल, सुनील पाटील, गोपाल पाटील, विजय निकम, मनिष चौधरी, संदीप बेदमुथा, सुशील नवाल, पंकज काबरा, किसन पावरा, अनिता कांकरिया, संगीता अट्रावलकर, डॉ. अनिता भोळे, संध्या तिवारी, जयंती चौधरी, देवेंद्र भावसार, मंदार पाठक आदी सदस्यांचा या कार्यकारिणीत समावेश आहे.