जळगाव प्रतिनिधी । राज्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच घेण्यात येतील असे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यामुळे आता जिल्ह्यातील भडगाव व वरणगाव नगरपरिषदांच्या निवडणुकीची धामधुम सुरू होईल हे स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. मदान यांनी राज्यातील ९५ नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध ३१ नगर परिषदा, नगरपंचायतींमधील ३५ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यावर २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असेही ते म्हणाले.
जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप याद्यांवर २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १ मार्च २०२१ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ८ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगर परिषदांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगाव व वरणगाव येथील नगरपरिषदांचा समावेश आहे. यामुळे आता दोन्ही शहरांमध्ये निवडणुकीची धामधुम सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, नशिराबाद येथील नव्यानेच झालेल्या नगरपंचायतीचा मात्र यात समावेश करण्यात आलेला नाही.