जळगाव प्रतिनिधी । प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार व इतरांनी साक्ष फिरवल्याने चट्टया बाप्या खून प्रकरणातील आठही संशयितांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली.
गेल्या भोपा काठेवाडी याच्या फिर्यादीवरून चट्ट्या बाप्या खून प्रकरणी महेश चिंचोलकर, दिलीप बाबा भोसले, शंकर दिलीप भोसले, शंभू दिलीप भोसले, ललित माधव कुंवर, शकील शेख अकबर शेख, राहुल शांताराम सोनवणे, सचिन उर्फ फावड्या अरुण पाटील यांच्या विरोधात १६ जुलै २००७ रोजी शहर पोलिसात गुन्हा दाखल होता. त्याचा तपास तत्कालीन एपीआय अशोक गणपत कोलते यांच्याकडे होता. संशयितांनी चट्ट्या-बाप्या सोनवणे व गेल्या भोपा काठेवाडी यांना १५ जुलै २००७ रोजी चर्चेसाठी शाहू महाराज हॉस्पिटल आवारात बोलावले होते. त्यानुसार कारने दोघे दवाखान्यात गेले होते. त्या वेळी संशयित तेथे बसलेले होते. काही संशयित दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी तलवार, चॉपर, दांडा, आसार्यांनी चट्ट्या बाप्यासह गेल्या याच्यावर वार केले होते. यात दोघे जखमी झाले होते. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. १८ जुलै रोजी तीन दिवसांनी उपचार सुरू असताना चट्ट्या बाप्याचा मृत्यू झाला होता.
२०१४पासून या खून खटल्याचे कामकाज सुरू झाले होते. न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात या खटल्यात कामकाज झाले. यात सरकार पक्षातर्फे २० साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी ११ साक्षीदार फितूर झाले. यामुळे यातील सर्व संशयितांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.