जळगाव प्रतिनिधी । घरकुल प्रकरणात दोन वर्षे शिक्षा झालेल्या महापालिकेच्या पाच नगरसेवकांना महापौरपदाच्या निवडीच्या कामकाजात सहभागी होण्याची परवानगी देऊ नये, अशी हरकत घेणारा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला असून यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
घरकूल खटल्यात नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशिवराव ढेकळे, लता भोईटे व दत्तू देवराम कोळी या पाच विद्यमान नगरसेवकांना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेली आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. तसेच त्यावर उच्च न्यायालयाने स्टेदेखील दिलेला नाही.
या पार्श्वभूमिवर, संबंधीत पाच सदस्यांना १८ मार्च रोजी होणार्या महापौर निवडीच्या कामकाजात सहभागी होऊ देण्याबाबत हरकत घेणारा अर्ज नगरसेवक प्रशांत सोनवणे यांनी अॅड. सुधीर कुळकर्णी यांच्यातर्फे न्यायालयात दाखल केला. त्याची सुनावणी बुधवारी दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर न्यायमूर्ती शेख यांच्यासमोर होणार आहे.
याबाबत बुधवारी न्यायालय नेमके काय निर्देश देणार यावर गुरूवारी होणार्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीच गणित देखील थोड्या फार प्रमाणात अवलंबून असणार आहे. यामुळे या सुनावणीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.