Home Cities जळगाव जे. के. पार्क ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ

जे. के. पार्क ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ

0
44

जळगाव प्रतिनिधी । कराराची मुदत उलटूनही वापर करणार्‍या जेे.के. पार्कची जागा ताब्यात घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले असून याची अंमलबजावणी होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कराराची मुदत संपलेल्या जे. के. पार्कची जागा ३० दिवसांत ताब्यात देण्याचे आदेश महापालिकेने काढले आहेत. मुदत संपल्यानंतरही जागेचा ताबा ठेवल्याप्रकरणी मुदत संपल्यापासून नुकसानभरपाई अदा करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे महिनाभरानंतर प्रत्यक्षात जे. के. पार्कची जागा ताब्यात घेण्याची कारवाई होईल.

नगरपालिका असताना तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी १९८९ साली जे.के. डेव्हलपर्स यांना शिवाजी उद्यानातील जागा करारनाम्याच्या माध्यमातून दिली होती. यात स्वखर्चाने मिनी ट्रेन, मेन स्टेशन, मेरी गो राऊंड, इलेक्ट्रिक झुला आदींसाठी ११५ बाय ९५ चौरस मीटर अर्थात १० हजार ९२५ चौरस मीटर जागेमध्ये बसवण्याचे नमूद करण्यात आले होते. या ३० वर्षांच्या करारनाम्याची मुदत २६ डिसेंबर २०१९ रोजी संपली असली तरी ही जागा विकासकांच्याच ताब्यात आहे. यासंदर्भात नगरसेविका अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी स्थायी समिती व महासभेत विषय मांडून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आता जे.के. डेव्हलपर्स यांना आदेश काढले आहेत.

यामुळे आता जे.के. पार्कची जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आधी देखील हे प्रकरण खूप गाजले असतांना यावर कार्यवाही झालेली नाही. परिणामी आता तरी ही जागा महापालिकेच्या ताब्यात येईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound