जळगाव सचिन गोसावी । पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने ‘माझी वसुंधरा’ ही अतिशय उत्तम अशी मोहिम हाती घेतली असून याची जिल्ह्यात परिणामकारक अंमलबजावणी सुरू आहे. याची व्यापकता वाढविण्यासाठी नागरिकांनी हिरीरीने यात सहभागी होऊन याबाबतचा दृढ संकल्प घेण्यासाठी ऑनलाईन शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, राज्य सरकारतर्फे १ जानेवारीपासून राज्यात ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात याची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. यातच आता ‘माझी वसुंधरा’ अभियानाची व्याप्ती वाढविण्यात आली असून यात सर्वसामान्यांना सहभाग वाढावा यासाठी ऑनलाईन शपथ (ई-प्लेज) ही संकल्पना अंमलात आणण्यास प्रारंभ झालेला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले की, ‘माझी वसुंधरा’ ही मोहिम म्हणजे पंच महाभूतांचे संरक्षण व संवर्धन करणे होय. प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाची हानी होईल असे कोणतेही कृत्य करता कामा नये. आपल्या वैयक्तीक जीवनात प्लास्टीकसह अन्य घातक वस्तूंचा वापर टाळण्यासह पाण्याची नासाडी देखील टाळावी हे अपेक्षित आहे. ‘माझी वसुंधरा’ या मोहिमेत यालाच प्राधान्य देण्यात आलेले आहे.
यात जिल्ह्यातील नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. यासाठी कुणीही http://majhivasundhara.in या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन शपथ घेऊ शकतात. ही शपथ घेतल्यानंतर संबंधीत व्यक्तीला एक ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र त्या व्यक्तीला पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाची आठवण देत राहिल. या बाबींचा विचार करता जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी माझी वसुंधरा मोहिमेत सहभागी होऊन ऑनलाईन शपथ घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
खालील व्हिडीओत पहा जिल्हाधिकार्यांनी नागरिकांना नेमके काय आवाहन केले आहे ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3724960707594912